पुणे: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान १५ जानेवारीला पार पडेल, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यादरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा जोर धरत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड असून, येथे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केले आहे.
पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार की नाही?, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तसेच या प्रस्तावामुळे पुण्यात अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या २५ किंवा २६ तारखेला घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन- प्रशांत जगताप
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी ाज एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार गटाकडून कशाप्रकारे तोडगा काढला जाणार, हे बघावे लागेल. तसेच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणता राजकीय पर्याय आजमवणार याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची दुपारी १२ वाजता बैठक आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन आपला निर्णय ठाकरेंना आजच पक्षाच्यावतीने कळविण्यात येईल. अद्याप दोन्ही पक्षात बोलणी सुरू असून चर्चेतून योग्य मार्ग निघेल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे.